शेअर बाजार हे एक असे ठिकाण आहे जिथे पैसा उतावळ्या लोकांकडून चिकाटी ठेवणाऱ्या लोकांकडे जात असतो’ – वॉरन बफेट

‘यशस्वी गुंतवणूक करण्यासाठी हुशारीपेक्षा कितीतरी पट अधिक चिकाटीची गरज असते’ – वॉरन बफेट

 

धीर धरी

सप्टेंबर महिन्यापासून सुरु झालेल्या शेअर बाजारातील पडझडीमुळे मुच्युअल फंडातील लहान गुंतवणूकदार हवालदिल होणे साहजिक आहे. सेन्सेक्स किंवा निफ्टी अजून किती पडतील, गेले अनेक महिने निगुतीने केलेल्या आपल्या बचतीचे आता काय होणार, पुढील गुंतवणूक थांबवावी काय, अजून नुकसान होण्याआधी पैसे काढून घ्यावेत काय असे असंख्य प्रश्न अशा गुंतवणूकदारांच्या मनात येत असतील. गुंतवणूक क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्तीची - वॉरन बफेटची – वरील दोन वाक्यं अशा सर्वांना योग्य दिशा दाखवणारी ठरतील.

कुठल्याही व्यक्तीने मुच्युअल फंडातील इक्विटी योजनेत गुंतवणूक करण्याआधी शेअर बाजारातील चढउतार सहन करण्याची मानसिक तयारी करणे अत्यंत महत्वाचे असते. शेअर बाजारात बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा कितीतरी जास्त परतावा मिळू शकतो. मात्र त्यासाठी संयम आणि चिकाटीची नितांत गरज असते. कारण इथे मुदत ठेवींप्रमाणे स्थिर दराने परतावा मिळणार नसतो, तर अनेक महिने – काही वेळा वर्ष – गुंतवणूक नुकसानीत दिसत राहू शकते. मात्र चांगले दिवस आले की थोड्याच अवधीत अशी गुंतवणूक नुकसानच भरून काढते असे नव्हे तर वर नफाही करून देते.

ह्या संदर्भात आमच्या दोन मित्रांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला मित्र उच्चविद्याविभूषित, स्वतःचा व्यवसाय चालवणारा, हाताखाली ८-१० लोकांची टीम बाळगणारा. २००६-०७ ला शेअर बाजारातील तेजी पाहून त्याने मुच्युअल फंडातील इक्विटी योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. मित्रांसोबत सल्लामसलत आणि इंटरनेट ह्यांच्या मार्फत माहिती काढून त्याने सुरुवात केली. इंटरनेटवर आपल्या गुंतवणूकींचा पोर्टफोलिओ बनवून तो रोज सकाळी कॉम्प्यूटर सुरु केला की त्याचा परामर्ष घेऊ लागला. २००८ पर्यंत तेजीत असलेल्या बाजारामुळे त्याचा उत्साह वृद्धिंगत होत गेला आणि इक्विटी योजनेतील गुंतवणूक हा आपला एक फार चांगला निर्णय होता ह्याबद्दल त्याची अगदी पक्की खात्री झाली. २००८ च्या उत्तरार्धात झालेली शेअर बाजारातील अभूतपूर्व पडझड ही त्याच्यासाठी एक कल्पनातीत गोष्ट होती. ह्या धक्क्यामुळे आतापर्यंत निर्माण झालेल्या त्याच्या आत्मविश्वासाला तडा गेला. २००९ पासून २०११ पर्यंत बाजाराने मारलेल्या उसळीने त्याच्या मनाला उभारी मिळाली खरी, पण जेव्हा २०११-१२ मधे बाजार पुन्हा गटांगळ्या खाऊ लागला आणि जरा जरा वर येऊ लागलेल्या गुंतवणुकीवरील परताव्याने मान टाकली तेव्हा त्याचा संयम संपला. ऑफिसच्या नुतनीकरणासाठी त्याने इक्विटी योजनेतील सगळ्या गुंतवणूकी विकून टाकल्या आणि सुटकेचा निश्वास सोडला.

 

 

ह्या उलट आमचा दुसरा मित्र - शिक्षणाने बेतास बात, राहायला खेडेगावात, एका स्थानिक मंदिराचा पुजारी आणि घरोघरी पूजा सांगून चरितार्थ चालवणारा, इंग्रजीशी फक्त तोंडओळख आणि कॉम्प्युटर किंवा इंटरनेटपासून हजारो मैल दूर. बँकेत पैसे भरताना त्याला तिथल्या कर्मचाऱ्याने ‘मुच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेत गुंतवणूक का करत नाही’ विचारलं आणि काहीही माहिती नसताना केवळ विश्वासावर ह्याने होकार दिला. कर्मधर्मसंयोगाने त्याचीही गुंतवणूक २००६-०७ च्या सुमारासच सुरु झाली. दर महिन्याला ठराविक पैसे त्याच्या खात्यातून परस्पर मुच्युअल फंडात जाऊ लागले – सिस्टमॅटीक इन्वेस्टमेंट प्लान (SIP). ह्याची परिस्थिती अशी की गुंतवणुकीचा परतावा मोजण्याचा काहीच मार्ग उपलब्ध नाही. महिन्या दोन महिन्यातून जेव्हा तो बँकेत जाई तेव्हाच काय ते कळणार. अर्थातच २००८-०९ मधे त्याचीही गुंतवणूक नुकसानीत गेली. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून त्याने SIP चालूच ठेवली. पुढे २०११-१२ मधे गुंतवणूक सुरु करून ५-६ वर्ष झाली आणि तरीही फारसा उत्साहवर्धक परतावा दिसत नाही असं पाहून त्याच्याही मनाची चलबिचल सुरु झाली. आणि ‘ही असली गुंतवणूक मला नको, ती ताबडतोब बंद करा’ सांगायला तो बँकेत येऊन पोचला. तिथल्या कर्मचाऱ्याने त्याला थोडा संयम बाळगायचा सल्ला दिला आणि ‘हवं तर SIP बंद करा पण आता पर्यंत केलेली गुंतवणूक काढून घेऊ नका’ असं सांगितलं. आणि आमच्या ह्या मित्राने ते ऐकलं.

२०१३ सालच्या डिसेंबर महिन्यात सुरु झालेली बाजारातील तेजी जानेवारी २०१५ पर्यंत निफ्टीला ६०% वर घेऊन गेली. आणि काय आश्चर्य! अवघ्या १२ महिन्यात ह्या दुसऱ्या मित्राच्या २००६-०७ पासूनच्या संपूर्ण गुंतवणुकीवर प्रतिवार्षिक १५% हून अधिक परतावा दिसू लागला. भले अज्ञानजन्य असेल, पण त्याच्या संयम आणि चिकाटीचं हे यश होतं. केशवसुतांचे शब्द “धीर धरी रे, धीरापोटी असती मोठी फळे गोमटी” अक्षरशः खरे ठरले होते.

त्याचवेळी आमचा पहिला मित्र हात चोळत बसण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता. जुना पोर्टफोलिओ पुन्हा काढून ‘आज त्याची किंमत किती झाली असतीह्याची गणितं तो करत राहिला. केवळ अधीरपणामुळे त्याच्या हातून एक चांगली संधी सुटली होती. सुदैवाने ‘अशी चूक पुन्हा करायची नाही’ हे ठरवून त्याने तेव्हाच नव्याने सुरुवात केली.

इक्विटी योजनेतील गुंतवणुका ह्या शेअर बाजारातील चढउतारांवर अवलंबून असतात. त्यामुळे त्या करताना दीर्घ मुदतीसाठी करणं आवश्यक ठरतं. अनेकदा आपल्या गुंतवणुकीचे मूल्य घटलेलेसुद्धा आपल्याला बघावे लागते. बाजारात पडझड होते तेव्हा प्रसारमाध्यमात एकावर एक वाईट बातम्या देण्याची जणू चढाओढ सुरु होते. ह्या सगळ्या गदारोळात आपले लक्ष विचलित होऊ न देणं आणि आत्मविश्वास अढळ ठेवणं गरजेचं असतं, अन्यथा आमच्या त्या पहिल्या मित्रासारखी अवस्था होऊ शकते.

लहान गुंतवणूकदारांनी शेअर बाजार किती पडेल, कधी वर जाईल, उद्या कुठे जाईल अशा प्रश्नांवर प्रमाणाबाहेर वेळ घालवून काहीच साध्य होत नाही. जे लोक बाजारात रोज उलाढाल करतात अशांना ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मतलब असू शकतो, पण जे १०-१५ वर्षांसाठी गुंतवणूक करतायत त्यांनी ह्या चर्चेत फारसे स्वारस्य ठेवू नये. महत्वाचे एवढेच आहे की शेअर बाजार कितीही पडला तरी कालांतराने तो पुन्हा उसळी घेतो आणि इतिहासाने हे पुनःपुन्हा सिद्ध केलं आहे.

 

-- रामकृष्ण कशेळकर / (गुंतवणूक तज्ञ)

[email protected]

 

Converted to HTML with WordToHTML.net